
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी), दि. २६ ऑक्टोबर :
कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट, प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनात्मक बळ! महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटना, पुणे अंतर्गत चामोर्शी शाखेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे चामोर्शी तालुक्यातील सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवक संवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील सर्व सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत तालुकाध्यक्षपदी प्रदीप मुंडे, तर कार्याध्यक्षपदी भारती कोचाळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी वैभव उत्तरवार व आशिष मोहुर्ले, सचिवपदी उत्तम खंडारे आणि कोषाध्यक्षपदी गणेश सोमनकर यांची निवड झाली.
याशिवाय जिल्हा प्रतिनिधी पुरुष म्हणून रवींद्र गेडाम, जिल्हा प्रतिनिधी महिला म्हणून स्मिता निमगडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेश्वर मळावी, तालुका संघटक म्हणून सोनी गावडे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी उमेश उडान यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना राहणार सक्रिय!
सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावणे, प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणे, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज उठवणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, याला नवनियुक्त कार्यकारिणी प्राधान्य देणार आहे.
संघटनेची ताकद ही कर्मचाऱ्यांच्या एकजुटीत असून, सर्वांना विश्वासात घेऊन संवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कर्मचाऱ्यांचे हित, अधिकार आणि न्याय्य मागण्यांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवड प्रक्रियेदरम्यान उपस्थित सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची एकजूट अधिक बळकट होईल आणि त्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
चामोर्शी तालुका कार्यकारिणीच्या या बिनविरोध निवडीमुळे संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न, न्याय्य मागण्या आणि संवर्गाचे हित यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प या निवडीच्या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.

