
बालगोपालांच्या आकर्षक नंदीबैल सजावटीने वेधले लक्ष; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ड्रॉईंग किटचे वाटप
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी: शहरातील नगरपंचायत प्रांगणात शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी तान्हा पोळा उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने बालगोपालांचा पारंपरिक तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बालगोपालांनी विविध रंग, फुले व आकर्षक साहित्याने सजवून आणलेल्या नंदीबैलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. याच सोहळ्यात शहराच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा ‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. अशोक नेते होते, तर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर, किशोर ओल्लालवार, भाजपा तालुकाध्यक्षा तथा नगरपंचायत महिला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे, यशवंत त्रिकांडे, दीक्षित गुरुजी, माणिकराव तुरे, तुषार दूधबळे, अविनाश तालापल्लीवार, निरज रामानुजनवार, नरेश अल्सावार, भुवनेश्वर चुधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशोक नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक उत्सवांच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने कर्तृत्ववानांचा सन्मान
चामोर्शी शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. दीक्षित गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, सेवानिवृत्त शिक्षक दुबे, , डॉ. तामदेव दुधबळे , उद्योजक तपन दोषी,रवी वाकुडकर आदी मान्यवरांना ‘चामोर्शी रत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळाली.
नंदीबैल सजावट स्पर्धेत बालगोपालांची चमक
तान्हा पोळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते बालगोपालांनी सजवून आणलेले नंदीबैल. बालकांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देणाऱ्या उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गट ‘अ’ मधील विजेते प्रथम क्रमांक आदिश्री शेट्टे,द्वितीय क्रमांक श्रव गोलाईत,तृतीय क्रमांक मायरा बुरांडे तर प्रोत्साहनपर निर्णय मानापुरे तसेच गट ‘ब’ मधील विजेते प्रथम क्रमांक आर्य भुरसे,द्वितीय क्रमांक सानिध्य दुधबळे तृतीय क्रमांक निहाश पुण्यपरेडडीवर तर प्रोत्साहनपर बक्षीस अंजना लाड यांना देण्यात आले.
परीक्षकांनी बालगोपालांनी सजवून आणलेल्या नंदीबैलांचे बारकाईने परीक्षण करून वयोगटानुसार उत्कृष्ट सजावटीची निवड केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आमदारांच्या उपक्रमाने बालगोपालांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतःच्या वतीने नंदीबैल सजवून आणलेल्या सर्व बालगोपालांना ड्रॉईंग किटचे वाटप केले. या उपक्रमामुळे बालगोपालांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पारंपरिक उत्सवाला बालप्रतिभा आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका प्रेमा आईंचवार यांनी केले. सूत्रसंचालन रमेश अधिकारी व नम्रता दिकोंडावार यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार व चामोर्शी मित्र परिवारांनी सहकार्य केले.
परंपरा, संस्कृती, बालप्रतिभा आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा चामोर्शीतील यंदाचा तान्हा पोळा उत्सव विशेष आकर्षणाचा ठरला.

