
NMMS परीक्षेत गणेश दुधबावरेची जिल्ह्यात टॉप-१० मध्ये दमदार बाजी; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विशेष सत्कार
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१० सप्टेंबर : चामोर्शी येथील यशोधरा विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी गणेश मनोज दुधबावरे याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्यातील टॉप-१० विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. त्याच्या या घवघवीत यशाची दखल घेत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथील सभागृहात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

गणेशच्या या उज्ज्वल यशामुळे यशोधरा विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची कमतरता नसून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर ते जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करू शकतात, हे गणेशने सिद्ध करून दाखविले आहे.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके यांचाही गणेशच्या यशातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यालयाकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून गणेशने NMMS परीक्षेत मिळवलेले यश हे विद्यालयासाठी निश्चितच अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे.
याप्रसंगी प्राचार्य शाम रामटेके म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच मोठी झेप घेऊ शकतात. गणेशचे यश हे केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”
गणेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे, तसेच मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
NMMSच्या निकालातून गणेशने मिळवलेले यश हे यशोधरा विद्यालयासाठी केवळ गौरवाचे नव्हे, तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे प्रेरणादायी पर्व ठरले आहे.

