
बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांशी साधला संवाद; ‘बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी सदैव कटिबद्ध’
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१० सप्टेंबर : शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि कृषी संस्कृतीला सलाम करणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या जन्मभूमी रेखेगाव (ता. चामोर्शी) येथे सर्जा-राजाची सहपरिवार विधिवत पूजा करून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आल्याने रेखेगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे शेतकरी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीच्या कामात बळीराजाला साथ देणाऱ्या या मुक्या जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. याच भावनेतून आमदार डॉ. नरोटे यांनी सर्जा-राजाची मनोभावे पूजा करून त्यांचे औक्षण केले.
यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, “मातीशी जुळलेली नाळ आणि शेतकऱ्यांप्रतीची कृतज्ञता हाच माझ्या समाजकारणाचा खरा पाया आहे.” शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या कष्टाला आणि योगदानाला कायमच सन्मान मिळाला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
बैलपोळ्याच्या निमित्ताने आमदार नरोटे यांनी शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या व अडचणींबाबतही संवाद साधला. कष्टकरी बळीराजाच्या संसारात समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सुख-समाधान नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
पारंपरिक संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी जोडलेला हा सण उत्साहात साजरा करताना गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्जा-राजाच्या सजवलेल्या जोडीचे पूजन, पारंपरिक विधी आणि शेतकरी बांधवांचा उत्साह यामुळे रेखेगावातील पोळ्याला विशेष रंगत आली.
“कष्टकरी बळीराजाला समृद्धी लाभो, शेतशिवार हिरवेगार होवो आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जीवनात सुख-समाधान नांदो,” अशी सदिच्छा व्यक्त करत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

