
२४ जिल्ह्यांचा दौरा, ५ हजार कार्यकर्त्यांशी संवाद, ५७९० किमी प्रवास;
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/मुंबई, प्रतिनिधी :
माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथील मंत्रालयातील मुख्यमंत्री कक्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या राज्यव्यापी संघटनात्मक कार्याचा सविस्तर अहवाल सादर केला.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांमध्ये व्यापक जनसंपर्क अभियान राबवत संघटन विस्तारावर विशेष भर दिला. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या अहवाल पुस्तिकेमध्ये राज्यातील २४ जिल्ह्यांचा दौरा, सुमारे ५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद, ५,७९० किलोमीटरचा प्रवास तसेच विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक बैठका व मार्गदर्शन कार्यक्रमांचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे.
अहवालानुसार, राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या शिक्षण, रोजगार, वनहक्क, पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक विकास तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
माजी आमदार डॉ. होळी यांनी बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी कल्याणकारी योजना, पक्षाची ध्येय-धोरणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. तसेच आदिवासी समाजातील युवक, महिला, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्यासाठी ठोस उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या राज्यव्यापी दौऱ्यात संघटन मजबुतीकरण, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांचे जाळे विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन आणि स्वजागृती यांसारख्या विषयांवर विशेष भर देण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अल्पावधीत केलेल्या व्यापक संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले. आदिवासी समाजातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे आणि पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आगामी काळातही समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा झाली. आदिवासी भागातील विकासकामांना गती देणे, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाल्याची माहिती डॉ. देवराव होळी यांनी दिली.
राज्यभरातील आदिवासी समाजाशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करणे आणि भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

