
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि.२३ जूलै:
देशभर गाजत असलेल्या कथित NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदीविरोधात चामोर्शी येथील लक्ष्मी गेट ते आष्टी कार्नर ते लक्ष्मी गेट रॅली काढून विद्यार्थी-युवकांनी तीव्र आक्रोश व्यक्त करत आंदोलन केले. जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी केली. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जंतरमंतर येथे न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदविला. “विद्यार्थ्यांच्या न्याय्य आणि शांततापूर्ण आंदोलनावर लाठीमार करणे ही लोकशाही मूल्यांना तडा देणारी बाब असून, लोकशाहीत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणालाही अधिकार नाही,” असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
“देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने उत्तर द्यावे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी “पेपरफुटी थांबवा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “लोकशाहीवरील दडपशाही बंद करा” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आंदोलन शांततेत पार पडले.

