
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.२३ जूलै:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दि.२३ जूलै रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋषीकांत पापडकर,कुणाल चिलगेलवार, पंडित पाटील मेश्राम पोलीस पाटील मारकबोडी, पंकज राऊत पोलीस पाटील डोंगरगाव, रुपेश चूधरी ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव, डॉ. रामटेके, डॉ .भागवत, फहीम काजी, कपिल बागडे, विजय धाकटे, जीवनदास देशमुख, मुकुंदा बावणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांचे पथक तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक औषधांचे मोफत वाटप तसेच नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त जनहिताचे उपक्रम राबविणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. उपस्थितांनीही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

