
नितेश गट्टीवार |गडचिरोली
आरमोरी,दि.२३ जूलै:
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना (२०२६–२७) अंतर्गत आरमोरी तालुक्यातील चोप येथे बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेचे अध्यक्ष रामदास मसराम यांच्या शुभहस्ते संबंधित शेत पांदण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सर्व ऋतूंमध्ये त्यांच्या शेतापर्यंत सुरक्षित व सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे, शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व सोयीस्कर करणे तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास साधणे हा आहे.
या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून शेती उत्पादन बाजारपेठेत पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यासही मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

