
नितेश गट्टीवार|गडचिरोली
चामोर्शी,दि.२३ जूलै
चामोर्शी शहरातील जिल्हा क्रीडा विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मैदानावरील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असून परिसरात वाढलेले गवत, झुडपे आणि अस्वच्छतेमुळे खेळाडूंना सराव करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष *निकेश गद्देवार* यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदाराकडून रखडलेली सर्व कामे निश्चित मुदतीत पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी केली आहे.
तसेच क्रीडांगणाची तात्काळ स्वच्छता करून खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
चामोर्शीसारख्या मोठ्या तालुक्यातील महत्त्वाचे क्रीडांगण दोन वर्षांपासून अपूर्ण राहणे ही दुर्दैवी बाब असून त्यामुळे अनेक होतकरू खेळाडूंचे नुकसान होत असल्याचे गद्देवार यांनी नमूद केले. प्रशासनाने यापुढे विलंब न करता काम पूर्ण करून क्रीडांगण नागरिकांसाठी खुले करावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

