
प्रेस नोट
सर्व तालुका व ग्रामीण भागात सुद्धा शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन
दि. 23 जुलै 2026 | गडचिरोली

दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत दि. 23 जुलै 2026 रोजी गडचिरोली जिल्हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी हा बंद संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #newsjagar
आयोजकांच्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उ.बा. ठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), आजाद समाज पार्टी, बीआरएसपी, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष तसेच विविध विद्यार्थी व सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिकांनी तसेच ग्रामीण भागातील लोकांनीही शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. #news jagar
आपल्या लेकरांचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पालकाने या आंदोलनात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, तो सरकारच्या क्रूर आणि असंवेदनशील भूमिकेचे उदाहरण असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. देशाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे अशोभनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आयोजकांनी पुढे असेही आवाहन केले की, उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवा आणि सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवा. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
उद्याचा गडचिरोली शहरासह जिल्हाभरात शांततापूर्ण, संविधानिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने बंद पुकारण्यात आला असून सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

