
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.२२ जूलै:
शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराचा निषेध तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी गडचिरोली शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगितले. “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने उत्तर द्यावे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनावर कथित लाठीमार झाल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी ही घटना लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले. पोलिसांचा दबाव आणून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असला तरी काँग्रेस पक्ष मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्याचा दावा काँग्रेसने केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, ज्येष्ठ नेते समशेर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, राष्ट्रीय समन्वयक कुसुमताई अलाम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पंचायतराज सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश डोंगरे, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत धाईत, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, प्रदेश महिला काँग्रेसच्या पुष्पलता कुंमरे, धानोरा तालुका महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष शेवंता हलामी, माधुरी मडावी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजेवाणी, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, हेमंत कोवासे, श्रीनिवास आंबटकर, दिगंबर घाईत, विजय सुपारे, शालिक पत्रे, नीलकंठ गोहने, दिगंबर बुल्ले, नंदू वाईलकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रीना गोवर्धन, चारुदत्त पोहणे, संजुभाऊ चन्ने, दिनेश सिडाम, आशिष घेर, राज घेर, गुड्डू हुलके, अनुराग निखाडे, सोनू आलन, निकेश कामीडवर, प्रज्वल कोंडेकर, तेजस कोंडेकर, जावेद खान, मिलिंद बारासगडे, सुधीर बांबोळे, ओमप्रकाश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

