
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.२२ जूलै:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात समाजहिताचा संदेश देणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमांमध्ये रक्तदान, अन्नदान, फळे वाटप, वृक्षारोपण, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण तसेच महिलांना शिलाई मशीन वाटप अशा अनेक सामाजिक उपक्रमांचा समावेश होता.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गडचिरोलीत दिवसभर विविध ठिकाणी सेवा महोत्सवाचे कार्यक्रम पार पडले.
सकाळी मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर वृद्धाश्रमातील रहिवाशांना तांदूळ, गहू, डाळ, खाद्यतेल, मीठ, तिखट आदी जीवनावश्यक वस्तूंचे अन्नधान्य कीट वितरित करण्यात आले.
यानंतर महिला व बाल शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात आले.
दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला डॉ. अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. समाजात रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नगर परिषद नगरभवन येथे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. अशोक नेते म्हणाले, “समाजसेवा हाच वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच खरी वाढदिवसाची भेट आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेवा, रुग्णांना मदत आणि पर्यावरण संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वात राज्य अधिक प्रगत होवो, हीच सदिच्छा.”
या कार्यक्रमांना आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, रेखा डोळस, गोविंद सारडा, डॉ. प्रणय खुणे, डॉ. नितीन कोडवते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवा महोत्सवातून “नरसेवा हीच नारायण सेवा” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून, समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम ठरला.

