
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी पोलिसांनी हरणघाट नाका परिसरात कारवाई करत गोवंशाची कथित अवैध व निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत दोन बैलांची सुटका करण्यात आली असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी मौजा हरणघाट नाका येथे सापळा रचला. मैडाळा गावाकडून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-40-CD-5192) वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बैलांना अत्यंत कमी जागेत कोंबून, पाय दोरखंडाने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी नितेश सुरेश बुरांडे (वय २२, रा. कुनघाडा) आणि रोशन जगन्नाथ चलाख (वय १९, रा. कुरुड, ता. चामोर्शी) यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान सुमारे १० हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा बैल, १० हजार रुपये किमतीचा पांढरा-धामणा रंगाचा बैल तसेच २ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८२/२०२६ दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र प्राणी हत्याबंदी (सुधारणा) अधिनियम २०१५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पी. जंगले करीत असून, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांच्या पथकाने केली.

