
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.२३ जूलै:
भाकरोंडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांची गंभीर दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी आश्रमशाळेला भेट देत तब्बल सायंकाळी ४ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांची त्यांनी सखोल तपासणी करत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

आश्रमशाळेची क्षमता केवळ २५० विद्यार्थ्यांची असताना सध्या ५०५ विद्यार्थी वास्तव्यास असल्याने निवास व इतर सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या आमदार मसराम यांनी गांभीर्याने ऐकून संबंधित प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी त्यांनी आश्रमशाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सोयी-सुविधा आणि व्यवस्थापनाचीही सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळावे, यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार रामदास मसराम म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या प्रत्येक समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
आमदारांच्या या सखोल पाहणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आश्रमशाळेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

