
प्रेस नोट
गडचिरोली : संसद भवन मार्च दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अमानुष लाठीचार्ज प्रकरणाचे गडचिरोलीत तीव्र पडसाद उमटले. सत्ता विरोधी सर्वपक्षीय गडचिरोली बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व शाळा – महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले होते. स्थानिक गांधी चौकात धरणे देण्यात आले. यादरम्यान विद्यार्थी प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सरकारचा निषेध करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
वंचित आघाडीचे नेते बाळू टेम्भूर्णे, जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे, जी. के. बारसिंगे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जरात्ते, जयश्री जराते, आजाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, हंसराज उंदीरवाडे, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे मिलिंद बांबोळे, माकपचे डॉ. धर्मराज सोरदे , टायगर सेनेचे चंद्रशाह उईके तसेच सामाजिक कार्यकर्ता गौतम मेश्राम, विलास निंबोरकर, सुरज पीपरे, चंद्रकांत भोयर, प्रतिक डांगे, प्रितेश अंबादे आदी उपस्थित होते.

आंदोलना दरम्यान पोलिस निरीक्षकांनी धमकावल्याने संताप
आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने वारंवार जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही विद्यार्थी आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवत असताना संबंधित विद्यार्थ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी करून दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला.
याशिवाय, काही शिक्षकांनी शाळेला सुट्टी दिल्यानंतर पालक म्हणून आंदोलनात सहभाग घेतला असता, त्यांना पोलीस निरीक्षकांनी “तुमच्या शाळेच्या प्राचार्यांचा क्रमांक द्या, तुम्हाला लेटर इश्यू करायला सांगतो” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करत संबंधित शिक्षकांनी, “आम्हालाही संविधानाने शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार आहे. येथे कोणत्याही पक्षाचे बॅनर नाहीत. आमचीही मुले दहावी-बारावीत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे धमकावणे योग्य नाही,” अशी भूमिका आंदोलक शिक्षकांनी घेतली.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असून, आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना धमकावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

