
समता परिषदेच्या इशाऱ्याची दखल; फुले–सावित्रीबाई चौकाच्या सौंदर्यीकरणाला अखेर गती!
आमदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे नगर परिषदेला स्पष्ट निर्देश – “काम तातडीने सुरू करा”
मूल | प्रतिनिधी | दि. २१ जुलै

मूल शहरातील महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या रखडलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आक्रमक भूमिका घेत १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तातडीने हस्तक्षेप करत नगर परिषद, मूलच्या मुख्याधिकाऱ्यांना कोणताही विलंब न करता मंजूर काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
समता परिषदेचे शहराध्यक्ष राकेश देविदास मोहुर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात काम त्वरित सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला ठोस इशारा दिला.
या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी नगर परिषद प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मंजूर निधीचा प्रभावी वापर करून चौकाचे सौंदर्यीकरण वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राकेश मोहुर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करत, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना साजेसा, सुशोभित आणि प्रेरणादायी चौक लवकरच साकारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“रखडलेल्या कामाला वेग; उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये!”

