
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
अहेरी (गडचिरोली) : गेल्या सुमारे २० वर्षांपासून अहेरी आगारातून सुरू असलेली आणि प्रवाशांची पसंती मिळवलेली अहेरी–हैद्राबाद बसफेरी बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, तसेच तेलंगणा राज्यातील कागजनगर, आसिफाबाद आणि मंचिरीयाल या शहरांसाठी नव्या बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गडचिरोली विभागीय नियंत्रक (डीसी) चंद्रकांत वडस्कर यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अहेरी–हैद्राबाद बसफेरी सुरूच ठेवण्यास सहमती दर्शविण्यात आली असून तेलंगणासाठी नव्या बसफेऱ्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचेही विभागीय नियंत्रकांनी मान्य केले आहे.
अहेरी दौऱ्यावर आलेल्या विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांची नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. अहेरी–हैद्राबाद बसफेरी बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण तसेच तेलंगणात नातेवाईक असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जनतेच्या भावना आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय तातडीने मागे घेण्याची त्यांनी जोरदार मागणी केली.

या चर्चेनंतर विभागीय नियंत्रकांनी सकारात्मक भूमिका घेत अहेरी–हैद्राबाद बसफेरी पूर्ववत सुरू ठेवण्याचे मान्य केले. यावेळी अहेरी आगाराचे आगार व्यवस्थापक (डीएम) अंकुश खाडिलकर उपस्थित होते.यावेळी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी मांडली. अहेरीलगत वांगेपल्ली–गुडेम या दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाला सात वर्षे पूर्ण झाली असून अहेरी परिसरातील नागरिकांचे तेलंगणाशी रोटी-बेटीचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे तेलंगणातील आसिफाबाद आगाराच्या दररोज पाच बस अहेरीपर्यंत प्रवासी वाहतूक करत असताना, अहेरी आगारातून अद्याप एकही नियमित बस तेलंगणासाठी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे संभाव्य महसुली नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांनी अहेरी आगारातून कागजनगर, आसिफाबाद आणि मंचिरीयाल या मार्गांवर नवीन बसफेऱ्या सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गांवर बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहेरी–हैद्राबाद बसफेरी सुरू ठेवण्याचा निर्णय आणि तेलंगणासाठी नव्या बससेवांचा प्रस्ताव यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

