
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या उपस्थिती; भव्य रोषणाई अन् डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. ०५ सप्टेंबर :

श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती तथा सकल विश्व हिंदू समाज, गडचिरोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे झालेल्या या भव्य सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सन २०११ पासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा यंदाही दिमाखात कायम राहिली.
या भव्य दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “गडचिरोलीत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. गडचिरोलीकरांचा उत्साह आणि सहभाग कौतुकास्पद आहे. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,” असे त्यांनी सांगितले.
उत्सवाच्या निमित्ताने अभिनव लॉन परिसरात करण्यात आलेली भव्य-दिव्य आकर्षक रोषणाई, विद्युत सजावट आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई यामुळे संपूर्ण परिसर कृष्णमय आणि उत्साहपूर्ण झाला होता. गोविंदा पथकांच्या जल्लोषामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या सोहळ्याचा आनंद लुटला.
याप्रसंगी आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सकल विश्व हिंदू परिषदेचे नेते रामायण खटी, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, भाजपाचे युवा नेते घनश्याम वाढई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे आयोजक अनिल तिडके, बंटी भाऊ उर्फ निकेश खडसे, परमानंद पुण्यपवार, अनुराग पिपरे, केशव मडावी, सागर सोनटक्के, राकेश नैताम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. नियोजनबद्ध आयोजनामुळे संपूर्ण उत्सव उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
भक्ती, उत्साह, परंपरा आणि तरुणाईचा जल्लोष यांचा अनोखा संगम ठरलेल्या या दहीहंडी उत्सवाने गडचिरोली शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित केला.

