
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,दि. ५ सप्टेंबर :
चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा भेंडाळा येथे मुला-मुलींना मारून टाकण्याची धमकी देणारी निनावी चिठ्ठी आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. घराच्या अंगणात प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ९० मिली देशी दारूची रिकामी बाटली, त्यात टाकलेला घरगुती भाजी कापण्याचा चाकू आणि त्यावर रक्तासारखा दिसणारा लाल रंग टाकलेला आढळून आला. यासोबतच वहीच्या चार पानांवर हस्ताक्षरात गावातील मुला-मुलींना मारून टाकण्याची धमकी देणारा निनावी संदेश आढळला.

ही घटना २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. विपुल अशोक उंदीरवाडे यांच्या घराच्या अंगणात ही संशयास्पद वस्तू व चिठ्ठी ठेवण्यात आली होती. वस्तू आढळल्यानंतर उंदीरवाडे यांनी प्रथम गावातील पोलीस पाटील तसेच शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच बीट अंमलदार शिवदास दुर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन विपुल उंदीरवाडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी बीट अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र, सदर वस्तू व धमकीची चिठ्ठी ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीबाबत त्यावेळी खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, ५ सप्टेंबर २०२६ रोजी विपुल अशोक उंदीरवाडे (वय ३१, रा. भेंडाळा) यांच्या तक्रारीवरून भेंडाळा गावातील मुला-मुलींना मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या निनावी चिठ्ठीप्रकरणी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि. सुमेध बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, मा. न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास सुरू आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांना माहिती द्या
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद व्यक्ती अथवा या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तात्काळ चामोर्शी पोलिसांना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुला-मुलींना सतर्क राहण्याच्या व आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
धमकीची चिठ्ठी नेमकी कोणी ठेवली? या मागचा उद्देश काय? गावात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न कोणाचा? याचा उलगडा करण्यासाठी चामोर्शी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या प्रकरणाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

