
“स्वतःसाठी टेस्ला, पण ग्रामीण जनतेसाठी सक्षम बससेवा कधी?” -एनएसयूआय -जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे
प्रलय सहारे |प्रतिनिधी भेंडाळा : ग्रामीण आणि दुर्गम भागातील एसटी बससेवेच्या दुरवस्थेवरून आता NSUIने आक्रमक भूमिका घेतली आहे. “मंत्र्यांचा प्रवास आलिशान असू शकतो, मग सामान्य जनतेचा प्रवास मात्र त्रासदायक का?” असा थेट सवाल NSUI गडचिरोली जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिकांना आजही बससेवेसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये नियमित बसफेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शेतकरी व नागरिकांना बाजारपेठ, तहसील कार्यालय, जिल्हा मुख्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप वैरागडे यांनी केला.

“मंत्र्यांनी स्वतःसाठी टेस्ला, ऑडी, बीएमडब्ल्यू किंवा क्रेटा घ्यावी, त्याला आमचा विरोध नाही. मात्र महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना ग्रामीण जनतेच्या मूलभूत प्रवासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये,” असे राहुल वैरागडे यांनी स्पष्ट केले.
NSUIच्या ठोस मागण्या
NSUI गडचिरोलीच्या वतीने ग्रामीण एसटी सेवा सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोलीसह ग्रामीण व दुर्गम भागात नवीन एसटी बसेस उपलब्ध कराव्यात.विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार शाळा-महाविद्यालयीन मार्गांवर विशेष व नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.अपुऱ्या अथवा बससेवा नसलेल्या गावांचा सर्वे करून नवीन बसमार्ग सुरू करावेत.वारंवार बिघाड होणाऱ्या जुन्या बसेसची दुरुस्ती किंवा टप्प्याटप्प्याने बदली करावी.ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचे नियमित आणि विश्वासार्ह वेळापत्रक लागू करावे.गडचिरोलीतील दुर्गम भागातील एसटी प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करावा.
“एकदा सामान्य प्रवाशांसोबत एसटीने प्रवास करा!”
“परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोणतीही विशेष व्यवस्था न करता एकदा ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांसोबत एसटीने प्रवास करावा. विद्यार्थ्यांची धावपळ, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामान्य जनतेच्या प्रवासाचे वास्तव त्यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल,” असे वैरागडे यांनी सुनावले.
“जनतेला आश्वासने नकोत; नवीन बसेस, नियमित बसफेऱ्या आणि सुरक्षित प्रवास हवा आहे. ग्रामीण जनतेच्या या मूलभूत प्रश्नावर शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा,” अशी मागणी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे.

