
जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्त पुरस्कारासाठी १३ शिक्षकांची निवड; आज ५ सप्टेंबरला पुरस्कार वितरण
प्राथमिक गटातील १२ तर माध्यमिक गटातील एका शिक्षकाचा समावेश; गुणवंत शिक्षकांचा होणार गौरव
जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली : जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्त पुरस्कार २०२६ साठी जिल्ह्यातील १३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक गटातील १२ आणि माध्यमिक गटातील एका शिक्षकाचा समावेश आहे.
निवड झालेल्या शिक्षकांचा आज शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण विभागाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
प्राथमिक गटातील १२ शिक्षक
प्राथमिक गटातून सिरोंचा तालुक्यातील जि. प. शाळा नडीकुडाचे शिक्षक समय्या लक्ष्मण सदी, भामरागड तालुक्यातील जि. प. शाळा माकला येथील प्रा.शि. अनिरुद्ध लक्ष्मण केंद्रे, कोरची तालुक्यातील बोरी जि. प. शाळेतील विशेष शिक्षक ममता प्रदीप इंदूरकर, मुलचेरा तालुक्यातील गिताली जि. प. शाळेतील प्रा.शि. जानकीराम गोविंद पुलगमकर, कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव जि. प. शाळेचे शिक्षक मोडक धर्मानागोसे, एटापल्ली तालुक्यातील जवेळी जि. प. शाळेचे प्रा.शि. श्रीनिवास पोच्याजी पुलूरवार, अहेरी तालुक्यातील बोरी जि. प. शाळेतील वि.शि. शैलजा एम. गोरेकर, धानोरा तालुक्यातील निमगाव जि. प. शाळेतील प्रा.शि. वर्षा बाबुराव नाकाडे, चामोर्शी तालुक्यातील भिवापूर जि. प. शाळेतील प्रा.शि. संजय गणपत लोणारे, देसाईगंज तालुक्यातील विसोरा जि. प. शाळेतील प्रा.शि. अर्चना महादेव सांगोळकर, आरमोरी तालुक्यातील कोसंबी जि. प. शाळेतील प्रा.शि. प्रशांत विलास ठेंगरे आणि गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब जि. प. शाळेतील स.शि. राजेंद्र निळकंठ भुरसे यांची निवड करण्यात आली आहे.
माध्यमिक गटातून रवि विश्वनाथ नारनवरे
माध्यमिक गटातून देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील जि. प. हायस्कूलमधील स.शि. रवि विश्वनाथ नारनवरे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हास्तरावर मिळालेला हा सन्मान शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

