
सणासुदीमुळे फुलविक्रेत्यांची लगबग वाढली; पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२० ऑक्टोबर : दसरा आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा बहरल्या आहेत. पिवळ्या आणि केशरी रंगांच्या झेंडूच्या फुलांचे ढीग बाजारात पाहायला मिळत असून, फुलविक्रेत्यांची विक्रीसाठी लगबग सुरू आहे. सणासुदीच्या काळात घरांची सजावट, तोरणे, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने बाजारात फुलांची रेलचेल दिसून येत आहे.

रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या दुकानांमध्ये फुलविक्रेते झेंडूच्या फुलांची मांडणी करून ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसले आहेत. पिवळ्या आणि केशरी फुलांनी सजलेली दुकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सणाच्या निमित्ताने फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता असून, या हंगामी व्यवसायातून फुलविक्रेत्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
सणांचा उत्साह, फुलांचा सुगंध आणि बाजारपेठेतील रंगत यामुळे परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

