
धानाला क्विंटलमागे श्रीराम ५,००० ते ५,०५० रुपये, तर मोहरा ४,९०० ते ४,९५२ रुपये भाव

चामोर्शी,दि. २० ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, वजनात होणारी फसवणूक टाळावी आणि शेतमाल विक्रीचा व्यवहार पारदर्शक व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खासगी दुकाने व राईसमिलमध्ये विकण्याऐवजी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्येच विकावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये सध्या धानाला प्रतिक्विंटल श्रिराम ५,००० ते ५,०५० रुपये, तर मोहरा ४,९०० ते ४,९५२ रुपये भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री बाजार समितीच्या अधिकृत मार्केटमध्येच करून योग्य भावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी दुकाने व राईसमिलमध्ये शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांची वजनात फसवणूक होण्याची शक्यता असते. पोत्यांमधून धान खाली सांडणे, वजन करताना योग्य मोजमाप न करणे, पोत्यांचे वजन वजा न करता शेतकऱ्यांच्या मालाचे वजन करणे, तसेच माल विक्रीनंतर पैसे देण्यास टाळाटाळ करणे, अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
काही ठिकाणी माल खरेदी-विक्रीचे व्यवहार लेखी स्वरूपात न करता केवळ तोंडी केले जातात. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य रक्कम मिळण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. याउलट, बाजार समितीच्या मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध बाजार समितीकडून नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
१५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा; बाजार समितीचा विकासावर भर
मागील १५ वर्षांच्या कालावधीत बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बाजार समितीकडे सध्या सुमारे ६ कोटी रुपये जमा असून, त्यापैकी ३ कोटी रुपये विविध स्वरूपात गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
चामोर्शी येथील बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतमालाची साठवणूक व खरेदी-विक्रीची व्यवस्था आहे. बाजार समितीच्या आवारात सुमारे एक लाख क्विंटल माल साठवणुकीची क्षमता असल्याचेही सांगण्यात आले.
भाजीपाला व फळ मार्केट सुरू करण्याचाही प्रयत्न
चामोर्शी येथे भाजीपाला व फळ मार्केट उभारून त्याद्वारे खरेदी-विक्री सुरू करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व फळांची विक्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातूनच शेतमालाची विक्री केल्यास त्यांना योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि फसवणुकीपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे माल विकताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि शक्यतो बाजार समितीच्या अधिकृत मार्केटचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, सचिव निलेश पिंपळकर, अमोल गण्यारपवार , गोसाई सातपुते, रमेश बारसागडे, शंकर वंगावार , अभिजित बंडावार, कौशल्याबाई पोरटे, कांताबाई आभारे, विजय बहिरेवार , कुंदा जुवारे, सुनील कन्नाके, शामदेव ब्राम्हणकर, किशोर दोशी, नागोबा पिपरे, अनिल नैताम यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाने पिकवलेल्या धानाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत मार्केटमध्येच शेतमालाची विक्री करावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

