
स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिल आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांवर मार्गदर्शन; अनेक तक्रारींचे जागेवरच निराकरण

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (घोट), दि. २० ऑक्टोबर : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो.), दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वीज तक्रार निवारण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीजविषयक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आयोजित या शिबिरात घोट-आष्टी मंडळातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी, अवाजवी वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच विद्युत विभागाशी संबंधित विविध समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांना मार्गदर्शन
या शिबिराला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, महावितरणचे चामोर्शी तालुका कार्यकारी अभियंता देवगडे, उपअभियंता अस्वलकर आणि सपाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विद्युत सेवांशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
त्यापैकी अनेक तक्रारींचे शिबिरस्थळीच निराकरण करण्यात आले, तर इतर समस्यांबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाहीसाठी पुढाकार घेण्यात आला.
नागरिकांच्या समस्यांसाठी संयुक्त पुढाकार
वीज ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरण आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने एकत्रितपणे पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. सर्वसामान्य वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरला. घोट-आष्टी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आयोजकांच्या प्रयत्नांना यश
या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, भाजप तालुकाध्यक्ष राकेश सरकार, सरपंच सोमनाथ वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, विनोद किरमे, मास्टर किशोर कुंडू, महेश विश्वास, दिनेश मुजुमदार, पलास घरामी, जितेन शहा, विलास सावकार वडेट्टीवार, सुमेन विश्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, समीरण रॉय, गुरुदास पालकवार, सत्यवान तंटकवार, शुभम दास तसेच महावितरणच्या घोट मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

