
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी घेतले श्रीकृष्णाचे दर्शन; मंदिराच्या विकासासाठी पर्यटन ,दर्जा व रस्त्यांच्या कामांवर सकारात्मक चर्चा
चामोर्शी, दि. ५ सप्टेंबर :
श्री श्री राधा श्यामसुंदर मंदिर, कृष्णनगर धाम (इस्कॉन, चामोर्शी) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त गोपाळकाला व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्णाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

या धार्मिक सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी विशेष उपस्थिती लावत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांशी संवाद साधला.
याप्रसंगी इस्कॉन चामोर्शीचे अध्यक्ष तथा सचिव श्री. परमेश्वर दास आणि रामेश्वर गुरूजी यांच्या हस्ते डॉ. अशोकजी नेते यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मंदिराच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा
दर्शनानंतर डॉ. अशोकजी नेते आणि मंदिर प्रशासनामध्ये इस्कॉन चामोर्शी मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. चामोर्शीतील या धार्मिक स्थळाला ‘पर्यटन क्षेत्राचा दर्जा’ मिळवून देणे, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी रस्ता बांधकाम करण्याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
मंदिराच्या विकासाला चालना मिळावी आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. अशोक नेते यांनी मंदिर प्रशासनाला दिले.
या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपाचे युवा नेते संजय बारापात्रे, व्याहाडचे सुनील बोम्मनवार, प्रमोद बोम्मनवार यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर आणि श्रीकृष्णभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपाळकाल्याच्या उत्साहात आणि ‘हरे कृष्ण’च्या जयघोषात रंगलेल्या या जन्माष्टमी सोहळ्याने कृष्णनगर धाम परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.

