
हेडरी : लॉयड्स राज विद्यानिकेतन, हेडरी येथे ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगत, विशेष गीत, नाटिका आणि नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमास CSR प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती सुनीता मेहता, प्राचार्या श्रीमती अर्चना जोशी, मुख्याध्यापक श्री. हरेन मंडल तसेच प्रमुख पाहुण्या कविता मोहोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विशेष प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्या श्रीमती अर्चना जोशी यांनी मार्गदर्शनपर भाषणातून शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मार्गदर्शक असतात, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांविषयीच्या भावना मनोगतातून व्यक्त करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिक्षक दिन विशेष गीत, नाटिका आणि नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. विविध कलागुणांचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष जाणवत होता. शिक्षकांसाठी हाऊस-निहाय सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
LIF संचालिका श्रीमती कीर्ती रेड्डी आणि CEO श्री. नितीन चौधरी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या अॅड. कविता मोहोरकर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती तनुजा वर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. इयत्ता नववीतील विद्यार्थी प्रणित मंडल आणि रेश्मा धळी यांनीही आयोजनात मोलाचे सहकार्य केले. नियोजनबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचा आनंदी सहभाग यामुळे लॉयड्स राज विद्यानिकेतनमधील शिक्षक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला

