
चामोर्शी तालुक्यातील घटना; घोट पोलिसांकडून तपासाला वेग, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथे शेतात कामासाठी गेलेल्या ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह गावालगतच्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपिका रामचंद्र गायकवाड (वय ५८, रा. नारायणपूर, पोस्ट घोट) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपिका गायकवाड या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधमोहीम सुरू असतानाच गावालगतच्या रस्त्याच्या कडेला गोपिका गायकवाड या मृतावस्थेत आढळून आल्या.

घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्रातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गावालगतच्या रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळल्याने नारायणपूरसह घोट परिसरात चर्चेला उधाण आले आहे. महिलेच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून, पोलिस तपासातून या घटनेचे गूढ उकलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

