
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.१४ एप्रिल :
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश गौरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्यामसुंदर भरे, प्रा. शोभा गेडाम, तसेच गणेश वनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्याम भरे यांनी केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी गीतगायन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी मांडणी केली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा आणि विचारप्रवृत्तीला चालना मिळाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश गौरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचे प्रतीक होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज सराटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी मडावी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

