
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची दि.७
अतिदुर्गम, आदिवासीबहुल व अत्यंत मागासलेल्या कोरची तालुका ज्या उप विभागात मोडतो त्या कुरखेडा उप विभागासाठी पुर्ण वेळ नियमित उप विभागीय अधिकारी मागील सहा महिन्यांपासून महसूल विभागाला सापडता सापडेना असे झाले आहे . मागील एका वर्षात एक नव्हे तब्बल सहा जणांनी या कार्यालयाचा प्रभार सांभाळलेला असून सध्या हे कार्यालय रामभरोसेच चालत आहे.या ठिकाणी नियमित उप विभागीय अधिकारी नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचा खच पडलेला असून अनेक शेतकऱ्यांचे महसुली प्रकरण प्रलंबित असल्याने महसूल विभागाप्रती नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे.

कुरखेडा उप विभागीय कार्यालयातील भारतीय प्रशासकीय सेवेतील श्री रणजीत यादव यांची दि. १८ मार्च २०२५ ला गडचिरोली येथे स्थानांतरण झाल्यानंतर कुरखेडा उप विभागीय कार्यालयाला मागील एक वर्षापासून प्रभारी व अतिरिक्त कार्यभाराचे ग्रहण लागले आहे. या दरम्यान कुरखेडा उप विभागीय कार्यालयाचा प्रभार या उप विभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत दोन तहसीलदारांकडे उप विभागीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवली होती.
मध्यंतरीच्या काळात दि. ७ ऑगस्ट २०२५ ला भारतीय प्रशासकीय सेवेतील श्रीमती अनुष्का शर्मा ह्या नियमित उप विभागीय अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. त्याच्या प्रशासनिक पारदर्शकता, शिस्तप्रिय व कामाचा धडाका सर्व सामान्य नागरिकांना पटला मात्र काही भुखंड माफियांच्या पचनी पडला नाही. त्यांची बदली अवघ्या तीन महिन्यांतच दि. १७ डिसेंबर २०२५ ला झाली. तेंव्हापासून आजतागायत कुरखेडा उप विभागीय कार्यालयास नियमित उप विभागीय अधिकारी पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्रात एकही उप विभागीय अधिकारी महसूल विभागाला सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या अधिकाऱ्यावर महसूल विभाग मेहेरबान का
देसाईगंज उप विभागीय कार्यालयाचे वादग्रस्त उप विभागीय अधिकारी यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याकडे कुरखेडा उप विभागीय अधिकारी पदाची अतिरिक्त धुरा देण्यात आली आहे. देसाईगंज व कुरखेडा कार्यालयात काही निवडक कामे काढून घेण्यासाठी एक एजंट ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. एका स्वाक्षरीचे कमीत कमी पन्नास हजार रुपये असा रेटकार्ड ठरविण्यात आले आहे. कुरखेडा व देसाईगंज येथील प्रभार ठेवण्यासाठी महसूल विभागाला या अधिकाऱ्यांने तब्बल पंचवीस लाख एका माजी आमदाराच्या मार्फत पोहोचले असल्याची खमंग चर्चा सुरू असून यामुळे दोन प्रभार सोपविण्यात आले असल्याचे बोलले जात असून गौण खनिज तस्करांना मोकळीक दिली असल्याचे सांगितले जात आहे.
एका वर्षात सहा जणांकडे प्रभार
कोरचीच्या नागरिकांना कुरखेडा उप विभागीय कार्यालय गाठण्यासाठी ३६ किलोमीटरची पायपीट करावी लागते. मागील १८ मार्च २०२५ पासून भाप्रसे मानसी, तहसीलदार रमेश कुंभरे, तहसीलदार प्रशांत गड्डम, भाप्रसे अनुष्का शर्मा, भाप्रसे रणजित यादव व दि.१८ डिसेंबर २०२५ पासून आतापर्यंत देसाईगंज येथील उप विभागीय अधिकारी प्रसेंजीत प्रधान यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आले आहे.या प्रभार व अतिरिक्त कार्यभारामुळे कोणताही अधिकारी ठोस निर्णय घेत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. या ठिकाणी नियमित उप विभागीय अधिकारी देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

