
पेसा क्षेत्रातील 2023/24 च्या भरतीतील शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलवर रिक्त न दाखवण्याची मागणी
मागणी मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनात उपोषणाचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा इशारा
गडचिरोली : पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांनी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज माजी आमदार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात कंत्राटी शिक्षकांच्या विद्यमान जागा पवित्र पोर्टलवर रिक्त न दाखवण्याची मागणी स्पष्टपणे करण्यात आली.

शिक्षकांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या कंत्राटी शिक्षकांच्या जागा रिक्त दाखविल्यास त्यांच्या सेवेला मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे सदर निर्णय मागे घेऊन कंत्राटी शिक्षकांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी शिक्षकांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेत समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांनी सांगितले की, कंत्राटी शिक्षकांची मागणी न्याय्य असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांनी पुढे स्पष्ट इशारा देत म्हटले की, “जर ही मागणी तातडीने मान्य झाली नाही, तर हिवाळी अधिवेशनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उपोषणाला बसणार.” असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले.
कंत्राटी शिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेमुळे शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव वाढण्याची शक्यता असून आता शासन याकडे कसा निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी निवेदन देतांना विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, कंत्राटी शिक्षक अरविंद शेडमाके, लोकेश बरसागडे, सुरज मांदाडे, रंजित उंदीरवाडे, तिलेश मोहुर्ले आदी उपस्थित होते.

