
नागपूर : गंगा नगर येथील विर आदिवासी गोंडवाना बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या निर्धाराने साजरी करण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून समाज बांधवांना विस्तृत आणि प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी मंचकावर नागपूर चे माजी महापौर माया इनवाते, विकास परिषदेचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत कुमरे, महेंद्र उईके, गणेश मडावी, वासुदेव आत्राम, पंकज उईके, शागीर शेख, विजय पटले, देवेंद्र कटवे, माणिक पारधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रबोधनात्मक भाषणात डॉ. होळी यांनी सांगितले की, “बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी दिलेली लढाई ही फक्त इतिहास नसून आजच्या पिढीला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे.” त्यांनी जल-जंगल-जमीन या आदिवासींच्या जीवनाधारावर बोलताना प्रशासनाने संविधानिक हक्कांची पूर्तता करण्याची गरज अधोरेखित केली.
युवकांना उद्देशून ते म्हणाले की, आदिवासी समाजाची ताकद शिक्षण, संघटना, संस्कृती आणि एकतेमध्ये आहे. आजच्या काळात डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, आणि सरकारी योजना पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

डॉ. होळी यांनी आदिवासी परंपरा, भाषा आणि देवस्थाने जपण्याचे महत्त्वही मांडले. “आपली ओळख आपली संस्कृती आहे; ती जपली तरच बिरसा मुंडा यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, विविध समाजसेवी संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सांस्कृतिक सादरीकरण, पारंपरिक नृत्य आणि प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.
जयंती कार्यक्रमाची सांगता एकता, जागृती आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीचा संदेश देत करण्यात आली. यावेळी विर आदिवासी गोंडवाना बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष मनोज मडावी, उपाध्यक्ष वसंत गेडाम, सचिव अजय मसराम, सहसचिव वसंत गेडाम, कोषाध्यक्ष sachin आत्राम, आकाश कुंभरे, अंकेश धुर्वे, राकेश उईके, अनुप उईके, जयश्री इरपाची, काजल मसराम, अंजली मडावी, शारदा उईके, राम धुर्वे, प्रणय मडावी, नाना मडावी, अशोक कन्नाके, सुमन कुमरे, विनायक मडावी, सुमित मरापे, शालिनी पेंदाम, प्रवीण मसराम, लक्ष्मण धुर्वे आदी समाजबांधव उपस्थित होते.

