
कर्मचाऱ्यात शिस्तीचा अभाव; अधिकारी सुद्धा गायब
अमरावती – चांदूर बाजार येथील बेलोरा रोडवरील मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग क्र. ३ या कार्यालयातील कारभार सध्या अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. कार्यालयाचे उपविभागीय अभियंता अनुप खवणे हे नियमीत अनुपस्थित राहतात.
ते आठवड्यातून एखादाच दिवस कार्यालयात येतात, तर इतर कर्मचारी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सह्या करून लवकर निघून जातात.

आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता कार्यालयात फक्त सागर रहाटे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) व गजानन माकोडे (दप्तर कारकून) हेच उपस्थित होते. उर्वरित १८ कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. कार्यालयातील फेस रीडिंग व बायोमेट्रिक थंब मशीनही बंद आहे.ज्येष्ठ लिपिक, सहाय्यक अभियंते, लिपिक, कालवा निरीक्षक, मोजणीदार अशा अनेक पदावरील कर्मचारी गैरहजर असल्याचे रजिस्टरवर सह्या असूनही प्रत्यक्षात दिसून आले. यामुळे शेतकरी व नागरिकांना साहेब साईडवर आहेत असे उत्तर देण्यात येते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे
माहिती अधिकार २००५ चा बोर्डही चुकीचा आहे. त्यावर चुकीची नावे व पदनाम नमूद आहेत. माहिती अधिकारी व अपील अधिकारी म्हणून योग्य अधिकाऱ्यांची नावे लावलेली नाहीत.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या कार्यशिस्तीच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात असून, नागरिक व शेतकऱ्यांनी वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घ्यावी व कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

