
निकृष्ट बांधकामामुळे अनेक बंधारे गेले वाहून
अमरावती – अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाचे बंधारे २०२४-२५ मध्ये लाखो रुपये खर्च करून बांधकाम केलेले ९ ते १० महिन्यांतच वाहुन गेल्याने लघु पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामांची शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.
लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्य म्हणजे जलसंधारण आणि सिंचनासाठी छोटे जलाशय व बंधारे बांधणे असुन या विभागांतर्गत बांधण्यात येणारे बंधाऱ्याचे प्रकार म्हणजे गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारा, सिमेंट नाला,साठवण बंधारे आणि गॅबिन बंधारे यांचा समावेश होतो. जे भुजल पातळी वाढविण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी बांधले जातात. अंजनगाव तालुक्यात यावर्षी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असताना सुद्धा पहिल्याच पावसात अनेक बंधारे वाहून गेले असताना लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याने शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांवर रोष व्यक्त होत आहे.

लाखो रुपयांचे नुकसान होऊन अधिकारी फिरकले नाहीत
अंजनगाव सुर्जी तालुक्यात लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय असून या कार्यालया अंतर्गत तालुक्यातील खिराळा गावच्या चांद सुर्या नाल्यांवर अकरा महिन्यांपूर्वी ११ लाख खर्च करून बांधलेला गॅबिन बंधारा पुर्णतः वाहून गेला तर दुसर बंधारा हसनापुर पारर्डी येथिल नाल्यांवर बांधलेला वाहून गेला. तर तिसरा बंधारा लखाड येथिल वाहून गेला आहे. काही बंधारे यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान होऊन सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ अभियंता तालुक्यात पाहणी साठी फिरकले सुद्धा नसल्याने लघु पाटबंधारे जिल्हा परिषदेच्या विभागांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

