
{नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली }
भामरागड,दि.१४ जून : देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदावरील १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त केंद्र सरकारने राबविलेल्या विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशहिताच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भामरागड येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी मोदी सरकारच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा विकास, गरीब कल्याण, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जनसंपर्क अभियान राबवावे, असे आवाहन केले.

तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून शासनाच्या कार्याला अधिक व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गाथा पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस भाजपा पदाधिकारी दिलीप चलाख, जाधव हालदार, तालुका महामंत्री तपेश हालदार, सम्राट मल्लिक, रमेश गाडगे, माजी नगराध्यक्ष संगीता गाडगे, राकेश बडगे, दिनेश घोसरे, सखाराम भांडेकर, साईराम कोकमुदडीवर, योगेश गोमासे, दिवाकर सडमेक, कमलेश अधिकारी, तपन पाल आदी उपस्थित होते. बैठकीत आगामी जनसंपर्क अभियानाची रूपरेषा आणि संघटनात्मक विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

