
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/आरमोरी, दि. १३ जून :
येरकड ते मुरूमगाव या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता आमदार रामदास मसराम यांनी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आमदार मसराम यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच नागरिक व वाहनधारकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

