
“१९३० पासून अखंड गणेशोत्सवाची परंपरा; ‘मूलचा राजा’ म्हणून बाप्पाची ओळख सार्वजनिक नेताजी गणेश मंडळ मूल “
छोट्याशा पेंडालमधून सुरू झालेला प्रवास आज भव्य परंपरेत; पिढ्यान्पिढ्या सामाजिक एकतेचा संदेश..
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी!

मूल : सन १९३० मध्ये सुरू झालेली सार्वजनिक नेताजी गणेश मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा तेली मोहल्ला मूल मध्ये आज तब्बल ९६ वर्षांनंतरही अखंडपणे सुरू आहे. एका छोट्याशा पेंडालमधून आणि भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या मंडळाच्या गणेशोत्सवाने आज मूल शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, मंडळातील बाप्पाला भाविकांकडून ‘मूलचा राजा’ म्हणून ओळखले जाते.
या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात स्व. श्री. विठ्ठलराव चिटलोजवार, शंकरराव चिटलोजवार, गजाननराव कामडे, दिवाकरराव पडगेलवार, मनोहरराव चिंतावार, विश्वेश्वर गोगीरवार, जनार्धनजी चेपूरवार, शंकरराव गोगीरवार, गंगाधरजी मुद्देशवार यांच्यासह तत्कालीन अनेक पूर्वजांनी एकत्र येत केली होती. त्या काळात अत्यंत साध्या स्वरूपात सुरू झालेला हा गणेशोत्सव आज पिढ्यान्पिढ्या पुढे जात भव्य स्वरूप धारण करीत आहे.
विशेष म्हणजे, या मंडळाची परंपरा केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता एकता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारी परंपरा म्हणून पुढे आली आहे. कोणताही भेदभाव अथवा वैर न ठेवता सर्वांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
यापूर्वी गणेश मंडळात सतत ८५ वर्षापर्यंत आकर्षक असे पौराणिक देखावे सुद्धा बनवण्यात आले होते .
ज्यांनी या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या पूर्वजांच्या योगदानाचे स्मरण करत आजच्या पिढीनेही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेली आहे. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले; मात्र बाप्पावरील श्रद्धा आणि मंडळाची अखंड परंपरा कायम राहिली, अशी भावना मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली.
‘मूलचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरातील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते. ही परंपरा यापुढेही पिढ्यान्पिढ्या अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार आज (९६ व्या वर्षी ) सार्वजनिक नेताजी गणेश मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला.
Sarvjanik Netaji Ganesh Mandal Mul 96 Years ..
📝News Jagar Chetan Kamde 📝

