
नागपूर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाद्वारे ७ ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान पूर्व विदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ‘मंडल यात्रा २०२६’ च्या अधिकृत बॅनरवरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरच्या पहिल्या आणि सर्वात वरच्या ओळीत महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या व राज्याच्या थोर महामानवांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, याच ओळीत महामानवांच्या अगदी शेजारी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. यावरून सामाजिक स्तरातून आणि विरोधकांकडून काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.
बॅनरमधील या रचनेमुळे काँग्रेस नेत्यांनी स्वतःला महामानवांच्या बरोबरीत स्थान देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. “ज्या महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांसाठी वेचले, त्यांच्या रांगेत आणि बरोबरीने स्वतःचे फोटो लावून काँग्रेस नेत्यांनी उद्दामपणा दाखवला आहे,” अशी टीका विरोधकांनी केली आहे.

राजकीय फायद्यासाठी महामानवांच्या फोटोंचा वापर करताना प्रोटोकॉल आणि आदराचे भान राखले गेले नाही, ज्यामुळे हा थेट महामानवांचा अवमान आहे, असा सूर उमटत आहे. सदर ‘मंडल यात्रेचे’ नेतृत्व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे करत असून संयोजक मोरेश्वर भाडे आहेत. बॅनरवर ‘संविधानाचे रक्षण’ आणि ‘सामाजिक न्यायाचा संकल्प’ असे मोठे संदेश देण्यात आले आहेत. मात्र, बॅनर डिझाइन करताना सर्वात वरच्या मुख्य रांगेत महामानवांच्या सोबतच पक्षाच्या अंतर्गत राजकीय नेत्यांना स्थान दिल्याने संविधानाचा आदर राखण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड झाला असल्याची टीका होत आहे. माफीची आणि बॅनर बदलण्याची मागणीया प्रकरणावरून सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटत असून, नेत्यांचे फोटो महामानवांच्या खाली किंवा स्वतंत्रपणे असायला हवे होते, असे मत व्यक्त केले जात आहे. काँग्रेसने या चुकीबद्दल जाहीर माफी मागावी आणि तत्काळ सर्व ठिकाणाहून हे वादग्रस्त पोस्टर्स व बॅनर्स हटवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या वादावर आता काँग्रेस पक्षाचे अधिकृत नेतृत्व काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच यापूर्वी सुद्धा ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’च्या चित्राशी छेडछाड करण्यात आलेली होती तेव्हासुद्धा युवा काँग्रेस प्रभारी तसेच प्रदेशाध्यक्षांविरोधात मंगेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे निषेध व सीताबर्डी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे अशे निवेदन देण्यात आलेले होते,
नागपूर येथे युवा काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा जी तसेच इतर सह-प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत 26.05.2026 ला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेदरम्यान पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या पत्रकावर (लीफलेट/बॅनर) ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’ आणि परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. मात्र अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे त्या चित्रामध्ये दीक्षाभूमीच्या शिखरावर भगवा ध्वज फडकताना दाखविण्यात आला होता
काँग्रेसच्या व्यासपीठावरून असे प्रकार जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत काँग्रेस ला महामानवांसोबत काही घेणं देणं नाही असे दिसून येत असून, आगामी निवडणुकीत कुणालाही सोबत न घेता स्व-बळावरच निवडणूक लढवणार आहेत असे संकेत या माध्यमातून काँग्रेस देत आहे असे वाटते , भविष्यात असाच प्रकार सतत सुरु राहिला तर काँग्रेस ला पुन्हा भोपळा मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा बहुजन समाजमध्ये ऐकायला मिळत आहे.

