
प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
गडचिरोली : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गडचिरोलीत प्रस्तावित असलेल्या मत्स्यालय उभारणी प्रकल्पाबाबत आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात उभारण्यात येणारे मत्स्यालय केवळ मत्स्यप्रेमींसाठीच नव्हे, तर स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचेही विशेष आकर्षण ठरेल, अशा दर्जेदार व आकर्षक पद्धतीने त्याची उभारणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
मत्स्यालयाची रचना, आवश्यक सुविधा तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे विविध घटक यांचा विचार करून प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

गडचिरोलीच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळवून देणारा हा प्रकल्प ठरावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
प्रकल्प प्रत्यक्षात लवकरात लवकर साकारण्यासाठी संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याच्या तसेच सक्रियपणे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या बैठकीस मंत्री ना.नितेश राणे,आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मत्स्यालय प्रकल्पामुळे गडचिरोलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासोबतच जिल्ह्यातील नागरिकांसाठी मनोरंजन व ज्ञानाचे एक नवे केंद्र उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

