
‘थंड ग्रहासाठी जागतिक कृती’चा संदेश देत विद्यार्थ्यांची आष्टी चौकापर्यंत जनजागृती रॅली
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : पर्यावरणाचे रक्षण, ओझोन थराचे संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती करण्यासाठी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ओझोन दिनानिमित्त भव्य पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.

यंदाच्या ओझोन दिनाचे औचित्य साधून ‘थंड ग्रहासाठी जागतिक कृती’ या संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात आले. पृथ्वीला अक्षरशः थंड करणे नव्हे, तर वाढते जागतिक तापमान नियंत्रित ठेवणे हा ‘थंड ग्रह’ या संकल्पनेचा उद्देश असल्याचे विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून स्पष्ट केले. कार्बन डायऑक्साइडसह इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली रॅली आष्टी चौक मार्गे मुल रोडपर्यंत नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ओझोन थराचे संरक्षण, वृक्षसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या जनजागृती रॅलीचे नेतृत्व भूगोल विभागाच्या प्रा. मिनल गाजलवार व प्रा. डिंपल झाडे यांनी केले.
रॅलीमध्ये प्रा. डॉ. आर. एम. झाडे, प्रा. दीपक बाबणवाडे, प्रा. अजिंक्य भांडारकर, प्रा. संकेत राऊत, प्रा. अरुण कोडपे, प्रा. संन्यासी मंडल, प्रा. वंदना थुटे, प्रा. शुभांगी खोबे, प्रा. जयश्री बोबाटे, प्रा. श्रीकृष्ण रॉय, प्रा. हेमवती शुक्ला, प्रा. अश्विनी भिसे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ओझोन दिनाच्या निमित्ताने नुसती रॅली न काढता पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा उपक्रम नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणारा ठरला.

