
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात उपक्रम; डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा गडचिरोली जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मार्कंडा देव येथे विधिवत पूजा-अर्चना व जलाभिषेक करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आदिवासी मोर्चा गडचिरोली व भाजपा जिल्ह्याच्या वतीने हा जलाभिषेक सोहळा पार पडला.
यावेळी भगवान मार्कंडेय यांच्या चरणी विधिवत पूजा करून जलाभिषेक करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सेवा, समर्पण आणि जनसेवेचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नाचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, ‘सेवा व आपले योगदान’, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवेचा महाकुंभ यांसह विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय पवित्र जल संकलन तसेच वडनगर ते वाराणसी यात्रा यांसारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सेवा, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, राजू मोगरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. मार्कंडा देवाच्या पवित्र परिसरात झालेल्या जलाभिषेकाने ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

