
प्रतिनिधी|प्रलय सहारे
भेंडाळा,दि.२८ जूलै :
भेंडाळा गावात स्वच्छतेच्या अभावामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून तुंबलेल्या नाल्यांमध्ये साचलेले सांडपाणी, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि दुर्गंधीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या छायाचित्रातून नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था स्पष्ट दिसून येत आहे. नाल्यात कचऱ्याचे ढीग साचल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला असून घाण पाणी तुंबून राहिले आहे. यामुळे मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि नाल्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तातडीने नाल्यांची साफसफाई, साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट, फॉगिंग आणि औषध फवारणी करून गावाला मच्छरमुक्त करावे, अन्यथा साथीचे रोग फैलावल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

