
अद्याप ही तक्रार दाखल न केल्याने नागरिकांन मध्ये संभ्रमाची अवस्था
आर्वी- आर्वीच्या गट विकास अधिकार्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेत केलेल्या प्राथमिक चौकशीत आर्वी पंचायत समितीच्या मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसार यांनी २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार पुढे आले. या प्रकरणी लवकरच जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत होणार असली तरी हे प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी अद्यापही पोलिसांकडे वळते करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकार्यांवर दडपण कुणाचे असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.
मेघराज डोंगरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे ( sunita marskolhe ) यांनी प्राथमिक चौकशी पूर्ण केली. शिवाय त्यांनी चौकशी अहवाल जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन( parag soman ) यांच्याकडे सादर केला. मनरेगाच्या लाभार्थ्यांच्या वाट्याची शासकीय अनुदानाची रकम स्वत:च्या लाभासाठी एपीओ प्रणाली कसार यांच्या नावाने असलेल्या आर्वी येथील देऊरवाडा मार्गावरील स्टेट बँकेत असलेल्या अंबिका टीबीएम सप्लायर नामक बँक खात्यात वळती करणे हा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर जिल्हास्तरीय विशेष चौकशी समिती गठीत करण्यात येणार असल्याचे जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सांगितले. सीईओंच्या भूमिकेनंतर शनिवार व रविवार अशा सुट्या आल्याने अद्यापही विशेष चौकशी समिती गठीत झालेली नाही. २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे प्राथमिक चौकशी अहवालात पुढे आल्यानंतर सदर प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी पोलिस विभागाकडे वळते होणे क्रमप्राप्त होते. पण, अद्यापही पोलिसात तक्रार सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एपीओ प्रणाली कसार व त्यांना सहकार्य करणार्यांना कुणाचे पाठबळ आहे, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.
मनरेगा एपीओ प्रणाली कसार यांनी शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी अद्याप जिल्हास्तरीय विशेष चौकशी समिती गठीत झालेली नाही. सलग सुट्या आल्याने समिती गठीत करणे शिल्लक राहिले असले तरी लवकरच समिती गठीत होणार आहे. राहिला प्रश्न प्राथमिक चौकशीअंती कायदेशीर फौजदारी कारवाईचा तर जिल्हास्तरावरील चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी केल्यावर तेही केले जाईल, अशी प्रतिक्रीया जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी दिली.


