
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोईंदूळ गावात पुन्हा एकदा रस्त्याअभावी आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था समोर आली आहे. २० जुलै २०२६ रोजी सकाळी पुष्पां सुनील परसा (वय ३०) या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना गावात जावे लागले. मात्र गावात पक्का रस्ता नसल्याने आणि वाटेत नाला असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही.
अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गर्भवती पुष्पां परसा यांना स्ट्रेचरवर झोपवून तब्बल दीड किलोमीटरचा खडतर प्रवास केला. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून कसनसूर येथे नेण्यात आले. कसनसूर येथे तिची सुखरूप प्रसूती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पुढील उपचारासाठी तिला गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. माता आणि बाळ सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; मात्र या घटनेने रस्त्याअभावी दुर्गम भागातील नागरिकांचे वास्तव पुन्हा एकदा उघड केले आहे.

एकीकडे एटापल्ली तालुका लोहखनिजामुळे देशभर चर्चेत आहे. या भागातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, तर दुसरीकडे याच तालुक्यातील नागरिकांना मूलभूत रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनविण्याचे स्वप्न व्यक्त केले जात आहे; मात्र त्याच जिल्ह्यातील गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून न्यावे लागते, ही विकासाच्या दाव्यांची गंभीर विसंगती आहे.
गोटाटोल्याच्या घटनेनंतरही प्रशासनाला धडा मिळाला नाही आणि आता कोईंदूळमध्ये पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे. मोठमोठ्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील दुर्गम गावांची दयनीय अवस्था यामधील दरी कधी भरून निघणार, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. शासनाने केवळ आश्वासने आणि विकासाच्या गप्पा न मारता कोईंदूळसह रस्त्याविना असलेल्या सर्व गावांमध्ये तातडीने पक्के रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाच नाल्यांनी वेढलेली चार गावे; पावसाळ्यात जगाशीच तुटतो संपर्क!
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणारी कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही चारही गावे जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल भागात वसलेली आहेत. मात्र पावसाळा सुरू झाला की या गावांतील नागरिकांचे जीवन अक्षरशः बेटावर अडकलेल्या लोकांसारखे होते. कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या गावकऱ्यांना वाटेत येणारे दोन मोठे नाले आणि तीन लहान नाले, असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या गावांचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते आणि अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. नुकतीच कोईंदूळ येथील गर्भवती मातेला प्रसूतीसाठी तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून न्यावे लागल्याची घटना या भयावह वास्तवाची जिवंत साक्ष ठरली आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना आजही चार गावे पाच नाल्यांच्या विळख्यात अडकून पावसाळ्यात जगापासून तुटतात, ही शासन आणि प्रशासनासाठी निश्चितच गंभीर बाब आहे.
लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? चार गावे पावसात जगापासून तुटतात, गर्भवतींना स्ट्रेचरवरून न्यावे लागते!
कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी या चारही जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल गावांचा पावसाळ्यात बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. दोन मोठे आणि तीन लहान, अशा एकूण पाच नाल्यांमुळे या गावांतील नागरिकांना कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाणेही कठीण होते. नुकतीच कोईंदूळ येथील गर्भवती मातेला प्रसूतीसाठी तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून न्यावे लागले, ही घटना समोर आल्यानंतरही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येणार आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. एटापल्ली तालुका लोहखनिजामुळे देशभर चर्चेत असून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो; मात्र याच तालुक्यातील चार गावे पाच नाल्यांच्या विळख्यात अडकून पावसाळ्यात जगापासून तुटतात. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी या गावांकडे पाहावे, अन्यथा “लोकप्रतिनिधी झोपले आहेत का?”हा प्रश्न जनतेला विचारावा लागेल.

