
गडचिरोली/चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी बसस्थानकावर महिला बचत गटाच्या सचिवाच्या पर्समधून तब्बल ५० हजार रुपये चोरण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सतर्कतेमुळे फसला. संशय आल्याने नागरिकांनी तत्काळ आरोपी महिलेला पकडून तिची झडती घेतली असता चोरीची संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम तिच्याकडून जप्त करण्यात आली.
या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात अप.क्र. 371/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निराशा जितेंद्र कांबळे (वय 30), रा. हळदी माल, ता. चामोर्शी या एकता स्वयंम सहायता समूहाच्या सचिव असून, त्यांनी व महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी 20 जुलै 2026 रोजी बँक ऑफ इंडिया, चामोर्शी शाखेतून शेतीकामासाठी महिला सदस्यांना वाटप करण्यासाठी 1 लाख रुपये काढले होते. ही रक्कम पर्समध्ये ठेवून दोघी हळदीचक येथे जाण्यासाठी चामोर्शी बसस्थानकावर एसटीची प्रतीक्षा करत होत्या.
दरम्यान, बसमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत सकीना सेहवाग मानकर (वय 28), रा. बामणी (उमरेड), जि. नागपूर हिने फिर्यादीच्या पर्सची चेन उघडून त्यातील 1 लाख रुपयांपैकी 50 हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे.
मात्र, पर्समधील रक्कम कमी झाल्याचा संशय येताच फिर्यादीने आरडाओरडा केला. त्यानंतर बसस्थानकावरील प्रवासी व नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपी महिलेला पकडले. तिची तपासणी केली असता चोरीची ५० हजार रुपयांची संपूर्ण रक्कम तिच्याकडून हस्तगत करण्यात आली. नागरिकांच्या धाडसामुळे मोठी चोरी उघडकीस आली आणि आरोपीला पळ काढता आला नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार लीला ताडाम करीत असून, सपोनि बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सार्वजनिक ठिकाणी सावध राहा – पोलिसांचे आवाहन
चामोर्शी पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्या रकमेची वाहतूक करताना पर्स, बॅग व मौल्यवान वस्तूंवर सतत लक्ष ठेवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

