
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली/आरमोरी,दि.२१ जूलै:
आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरात रानटी हत्तीच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या परा व रोवलेल्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार मसराम यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कृषी सहाय्यक मेश्राम पंचनामा करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसानाचे अचूक व पारदर्शक पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
रानटी हत्तीच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, वनरक्षक डिकेश ढोलने, वनरक्षक अतुल धात्रक, वनमजूर प्रकाश गेडाम, केशव कुंभरे, किशोर आकारे, संजय खंडारकर, चंद्रकांत आकारे तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

