
गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली शहर भाजपातर्फे ‘सेवा महोत्सव’ अंतर्गत २१ जुलै ते ३० जुलै या कालावधीत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा महोत्सवाची सुरुवात आज उत्साहात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाने करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “एक वृक्ष – एक जीवन” हा संदेश देत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक व पर्यावरणपूरक परंपरा जपत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष ॶॅड. प्रणोती सागर निंबोरकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर महामंत्री तथा नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, केशव मडावी, नगरसेविका साक्षी बोलूवार, ज्येष्ठ नेते घनश्याम वाढई, शहर सहसचिव सागर सोनटक्के, आकाश बोलूवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा महोत्सवा अंतर्गत २१ ते ३० जुलैदरम्यान रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सवा’मुळे सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जनसेवेचा सुंदर संगम घडून आला असून, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली शहर भाजपाने सेवा आणि जनकल्याणाची प्रेरणादायी परंपरा जपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

