
अमित कत्तीवार, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली, (गडचिरोली): कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे आयोजित संसद भवन मार्चला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर निदर्शने करत राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, CPI) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा सदस्य, CPI), पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. पक्षाच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे आहे.
देशात वारंवार घडणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप CPIने केला आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अव्यवस्था आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात केंद्र सरकार व संबंधित मंत्रालय अपयशी ठरल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी CPIने केली आहे.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. वारंवार होणारे पेपर लीक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेले थेट अन्याय आहे. केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरून व्यापक जनआंदोलन उभारेल.”
या आंदोलनामुळे एटापल्लीत शिक्षणातील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पेपर लीक प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

