
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
अहेरी, दि. २१ जुलै : अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा जलद, पारदर्शक व प्रभावी निपटारा करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून वासवी सेलिब्रेशन हॉल, अहेरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, नागरिकांच्या प्रलंबित कामांचे निवारण तसेच आवश्यक सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून शासकीय सेवा अधिक सुलभपणे मिळणार आहेत.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारा तसेच संबंधित कामासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.
या शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित शासकीय कामांना गती मिळणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

