
प्रतिनिधी /रुपेश सलामे
कुरखेडा :- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शिवणी येथील होतकरू आदिवासी मुलगी पायल मडावी हिची देशातील प्रतिष्ठित अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या रांची (झारखंड) कॅम्पसमध्ये एम.ए. (Development) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शिवणी गावासह संपूर्ण कुरखेडा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर मात करत पायलने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या गुणवत्तेची दखल घेत विद्यापीठाने तिला १०० टक्के शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. त्यामुळे तिच्या उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला असून तिची ही कामगिरी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

एम.ए. (Development) या अभ्यासक्रमाद्वारे ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक धोरण आणि वंचित घटकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून समाजविकासासाठी कार्य करण्याचा तिचा मानस आहे. शिक्षणाच्या बळावर समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे तिचे स्वप्न असून त्यादृष्टीने ती पुढील वाटचाल करणार आहे.
पायल मडावी हिच्या या यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी तसेच परिसरातील नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाविषयी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

