
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि.२० जूलै : देशभरात गाजत असलेल्या कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी, पालक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आझाद समाज पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या संघर्षाला काँग्रेस पक्षाची साथ कायम राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “शिक्षण व्यवस्था पारदर्शक करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
मार्गदर्शन करताना ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, “स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अनेक वर्षे अथक परिश्रम घेतात. मात्र, वारंवार समोर येणाऱ्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी परीक्षा प्रक्रिया विश्वासार्ह, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करणे ही शासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.”
आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांसह फलक झळकविण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणालीच्या मागण्यांनी आंदोलनाला अधिक धार मिळाली.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव अभिजीत धाईत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉ. अमोल मारकवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, हजारो विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

